प्रांत अधिकारी यांच्या वक्तव्यावर शिक्षक सेनेची आक्रमक भूमिका
*प्रांताधिकाऱ्यांच्या वक्तव्यावर शिक्षक सेनेची आक्रमक भूमिका लेखी खुलासा मागवून कारवाईची मागणी; बीएलओ शिक्षकांशी सन्मानाने वागण्याच्या सूचना देण्याची मागणी*
सोलापूर, दि. १४ (सूर्यमुद्रा न्यूज)
: सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अभियानाच्या आढावा बैठकीत प्रांताधिकारी सदाशिव पडणे यांनी शिक्षकांविषयी कथितरीत्या "नालायकपणा" असा अवमानकारक शब्दप्रयोग केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. या प्रकरणाचा लेखी खुलासा मागवून संबंधितांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील शिक्षक बीएलओ व एसआयआरचे काम राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणे पार पाडत असून, नियमित शैक्षणिक जबाबदाऱ्यांसह हे अतिरिक्त काम करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या अडचणी समजून घेऊन सहकार्य करण्याऐवजी अवमानकारक भाषा वापरणे हे निषेधार्ह असून त्यामुळे संपूर्ण शिक्षक वर्गाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रांताधिकारी सदाशिव पडणे यांच्याकडून तात्काळ लेखी खुलासा मागविणे, वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक कारवाई करणे तसेच जिल्ह्यातील सर्व महसूल व निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांना बीएलओ व शिक्षकांशी सन्मानपूर्वक, संयमी व आदरयुक्त संवाद साधण्याबाबत स्पष्ट सूचना देण्याची मागणी केली आहे. भविष्यात कोणत्याही अधिकाऱ्याकडून शिक्षकांविषयी अवमानकारक भाषा वापरली जाणार नाही, याबाबतही निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, सोलापूर जिल्ह्याचे माध्यमिक जिल्हाध्यक्ष विजयकुमार बाबूराव गुंड आणि प्राथमिक जिल्हाध्यक्ष देवदत्त दाजी मेटकरी यांनी दिले असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शिक्षकांचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.