नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी अँड शिंदे, डॉ दोशी , सौ झोळ. , सौ मुथा ,सौ . शिंदे यांच्या प्रतिक्रिया
करमाळा ( 23) सूर्यमुद्रा न्यूज
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात सीबीआय (CBI) कडून देशभरात आणि महाराष्ट्रात सखोल तपास सुरू आहे
या प्रकरणी आतापर्यंत अनेक जणांना अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या शिवराज मोटेगावकरला सीबीआयने बेड्या ठोकल्या आहेत...
काही संशयितांच्या बँक खात्यांवरून मोठ्या प्रमाणावर संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचेही समोर आले आहे. खात्यांवरून झालेल्या पैशांचा व्यवहारावर नीट परीक्षेतील पेपर फुटीवरून देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी विविध राज्यांचे पोलीस तपास करीत आहेत
याप्रकरणी संपूर्ण देशामध्ये पालकांमध्ये प्रचंड संताप आहे, या अगोदरही असे प्रकार घडले आहेत .काय दबले गेले आहेत आणि काही दाबले गेले आहेत
यासाठी कायद्यांमध्ये कठोर अंमलबजावणी महत्त्वाचे आहे इतर देशातील कायदे पाहिले तर आपल्या देशामध्ये अशा प्रकरणांमध्ये कायद्यात कठोर कारवाई ही अपेक्षा जनतेमधून व्यक्त होत आहे.
कायदे कठोर केले तरच अशा दुष्ट प्रवृत्तीवर अंकुश लागेल अन्यथा या प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळणार आहे
ज्यांच्या हाती जीवनमान असे डॉक्टर यामधून घडणार आहेत
हा खेळ थांबवला नाही तर आपल्याच पिढ्यामधील काहींच्या जीवाशी खेळ होणार आहे
यामुळे चला सर्व जागृत होऊ या
सूर्यमुद्रा न्यूज च्या
"चला व्यक्त होऊ यां "
या प्लॅटफॉर्मवर करमळा तालुक्यामधील
अँड सविता शिंदे, डॉ.सुनिता दोशी, सौ. माया झोळ, सौ .ज्योती मुथा, सौ ज्योती शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत .
नरेंद्रसिंह ठाकुर
संपादक, सूर्यमुद्रा न्यूज
----------------------------------
----------------------------------
सरकारचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे ते संबंधित जे जे आरोपी आहेत त्यांच्याकडून वसूल करून घ्यावे
अँड . सविता शिंदे
---------------
** NEET म्हणजेच एमबीबीएस किंवा डॉक्टर होण्यासाठीची पात्रता परीक्षा या परीक्षेचे पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा पुन्हा 21 जून रोजी पुन्हा घेण्यात येणार असल्याचे माहिती सर्वांनाचआहे. खरं म्हणजे या नीट परीक्षेची तयारी अनेक मुलं वर्षानुवर्ष करतात. त्यासाठी खर्च करतात विशेषता गोरगरिबांच्या मुलांचे भवितव्य या परीक्षेवर आणि त्याच्या निकालावर अवलंबून असते. परंतु मागच्या काही वर्षापासून अनेकवेळा या परीक्षेचे पेपर फुटल्याच्या घटना घडलेल्या आहेत. 2017, 2021, 2024 आणि 2026 या वर्षामध्ये NEET परीक्षेचे पेपर फुटलेले आहेत. साधारणपणे यावर्षी 23 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार होते आणि या 23 लाख मुलांचे भवितव्य या पेपर फुटी मुळे धोक्यात आलेले आहे.
पेपर फुटल्यामुळे पुन्हा परिक्ष देण्याचा व भविष्याच्या चिंतेच्या तणावामुळे काही मुलांनी आत्महत्या देखील केल्या आहेत.
ही परीक्षा घेण्याची जबाबदारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे NTA कडे असतते आणि ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असते ती या परीक्षांचा आयोजन करत असते NTA घेत असलेल्या वेगवेगळ्या परिक्षांपैकी गेल्या पाच वर्षांमध्ये वेगवेगळ्या परीक्षांचे पेपर फुटलेले दिसतात तसेच पेपरफुटी व्यतिरिक्त आणखी वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळे म्हणजे पेपर अशा परीक्षांमध्ये झाल्याचेही मागच्या काही वर्षांमध्ये दिसून येत आहे. यामुळे लाखो गरीब, मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या वर्षी तर दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रातले बरेच आरोपी या परीक्षेचे पेपर फोडण्यामध्ये पुढे असल्याचे दिसले ती आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. खरंतर गोरगरिबांची हुशार मुलं आपल्या भवितव्यासाठी या परीक्षेच्या निकालाची आशेने वाट बघत असतात. परंतु जे पैसे देऊन प्रश्नपत्रिका विकत घेऊ शकत नाहीत त्यांच्याकडे गुणवत्ता असूनही त्यांना एम बी बी एस ला प्रवेश मिळू शकत नाही हे यावरून दिसून येते. ज्या मुलांचे पालक पैसेवाले आहेत
तेच अशा पेपर लीक करणाऱ्या क्लासला जातात तिथे लाखो रुपये खर्च करतात, पुन्हा लाखो रुपये देऊन प्रश्नपत्रिका विकत घेतात, गोरगरिबांची मुलं मात्र केवळ हा खर्च खर्च करू शकत नसल्यामुळे डॉक्टर होऊ शकत नाहीत.
कारण साधारणपणे 23 लाख मुलं ही परीक्षा देणार होते आणि देशभरामध्ये एमबीबीएसच्या केवळ एक लाख 29 हजार इतक्यात जागा आहेत. म्हणजेच जे प्रश्नपत्रिका विकत घेऊन परीक्षा देतील त्यापैकी श्रीमंतांच्या मुलांनाच फक्त एमबीबीएस साठी प्रवेश मिळू शकतो हे यावरून स्पष्ट होते. गरिबांच्या मुलांनी शिकायचं नाही अशी व्यवस्था सरकारने केलेली आहेच आधीच शिक्षणाचा खर्च प्रचंड वाढला आहे. दुसरीकडे अशा पेपर फुटीच्या प्रकारामुळे गरिबांच्या मुलांचे भवितव्य धोक्यात आलेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशा पद्धतीने श्रीमंतांची मुले प्रश्नपत्रिका विकत घेऊन जर एमबीबीएस ला प्रवेश मिळवत असतील तर सर्वसामान्य लोकांच्या भवितव्याशी सुद्धा खेळण्यासारखंच आहे.
मुख्य म्हणजे ही जी परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेसाठी जी फी विद्यार्थ्यांकडून घेतली जाते त्यातुन साधारणपणे साडेतीन हजार कोटी सरकारकडे जमा होतात आणि त्यातून सुमारे 500 कोटी रुपये सरकारकडे उरतात तरीही सरकार चांगल्या पद्धतीने परीक्षा घेत नाही. याआधी काही जणांनी अशा परीक्षांमध्ये जे घोटाळे केले होते त्यांच्यावर काही छोटी मोठी कारवाई झालेली आहे.
परंतु असं कधीही ऐकण्यात आलेले नाही की ज्या मंत्रालयाच्या अंतर्गत या परीक्षा घेतल्या जातात तेथील कुणाला किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांवर काही कारवाई झाली आहे. यावर्षीचीच्या पेपरफुटीतले तर जवळपास सर्व आरोपी आहेत ते सत्ताधाऱ्यांशी संबंधित आणि एका विशिष्ट वैचारिक परिवाराशी संबंधि असलेल आहेत. यावरूनच या परीक्षेच्या पेपरफुटी मध्ये सरकारच्या जवळच्या व्यक्तींचा हात आहे हे तर स्पष्ट आहे. असे असूनसुद्धा केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी याच्यावर साधे निवेदन केल्याचा सुद्धा दिल्याचे ऐकिवात नाही.
खरं म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी NEET परीक्षा पेपरफुटीची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे. दुसरे म्हणजे यामुळे सरकारचे देखील आर्थिक नुकसान झालेले आहे. ते संबंधीत आरोपींकडून वसूल केले पाहिजे. पेपर फुटीची निष्पक्षपातीपणे चौकशी तर झालीच पाहिजे परंतु दोषींवरती कडक कारवाई सुद्धा झाली पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये असे प्रकार घडणार नाहीत.
--------------------------------------
सखोल आणि निपक्षपाती पणे चौकशी होऊन, आरोपीवर कठोर कारवाई करावी
सौ.माया रामदास झोळ
----------------
NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरण हे अत्यंत गंभीर आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारे आहे. लाखो विद्यार्थी दिवस-रात्र मेहनत करून परीक्षा देतात, त्यामुळे अशा प्रकारच्या गैरप्रकारांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेत अधिक पारदर्शकता, तंत्रज्ञानाधारित सुरक्षा आणि उत्तरदायित्व आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अबाधित ठेवणे ही संबंधित यंत्रणांची जबाबदारी आहे.”
-----------------------------------
*फक्त गुण नको गुणवत्ता वाढवणारे शिक्षण हवे ...
डॉ. सुनिता दोशी
-------------
विद्येविना मती गेली...*
*मतीविना नीती गेली...* महात्मा ज्योतिबा फुले यांचे हे वचन...! परंतु सध्या
*विद्येसाठी मती असलेले* *लोक... निती* *सोडून वागत आहेत...* तेव्हा काय म्हणावे...?
सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही चालले आहे त्याने खरोखरच मती कुंठीत व्हावी अशी स्थिती आहे...!
कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षक परीक्षा हॉलच्या बाहेर काढायचे... आता तर क्लासचे चालक असलेले शिक्षक जर कॉप्या करत असतील तर काय होणार...?
वास्तविक पाहता वैद्यकीय क्षेत्रातील ऍडमिशन या गुणवत्तेवरच आधारित व्हायला पाहिजेत. परंतु खाजगी कॉलेजचे पेव फुटले आहे... त्यामुळे गुण नसलेले विद्यार्थी देखील पैसे भरून वैद्यकीय क्षेत्राकडे जात असलेले आपल्याला दिसते...! अशावेळी भविष्यातील समाजाच्या आरोग्याचे काय...? हा मूलभूत प्रश्न तर आहेच...आणि त्याचबरोबर आता तर वैद्यकीय क्षेत्रासाठी घेतली जाणारी नीट ही प्रवेश परीक्षा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे...!
हे स्पर्धेचे युग आहे , परंतु स्पर्धा ही निकोप हवी...! माझ्या क्लासचे जास्तीत जास्त विद्यार्थी कसे मेडिकलला जातात हे दाखवण्यासाठी त्यांना पेपरच उपलब्ध करून द्यायचे हा कोणता शॉर्टकट...?
सर्वसामान्य जनतेमध्ये आक्रोश आहे...' नीट सारख्या परीक्षेचा पेपर फुटतोच कसा...?' हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे...! परंतु रक्षक जर भक्षक झाले तर वेगळं काय होणार...? या सर्व गोष्टींमध्ये जबाबदार असणारे पेपर सेटर हे प्रोफेसर आहेत... चांगल्या पदावर असणाऱ्या व्यक्ती आहेत...! त्यांनी जर नीती सोडली तर सर्व काही ' *नीट* ' होणार कसे...?
आजचा विद्यार्थी हा केवळ गुण मिळवण्याच्या रॅट रेस मध्ये नुसता धावतो आहे...! पालक देखील आपल्या मुलाचे भवितव्य घडवण्यासाठी प्रचंड पैसे देऊन त्याला क्लासला घालतात...! नीट चा अभ्यास करण्यासाठी वेगळे क्लास पैसे भरून लावावे लागतात...! प्रचंड अभ्यास करावा लागतो...! बारावीची परीक्षा झाली तरी पुन्हा नीट ची तयारी करावी लागते...! आणि नीट ची परीक्षा झाल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकेपर्यंत, पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागणार.... हे समजल्यावर त्यांची मानसिकता काय होत असेल.... याची कल्पनाच केलेली बरी...!
पुन्हा परीक्षा घ्यायची म्हणजे पुन्हा त्या व्यवस्थेवर ताण....! किती गोष्टी आहेत...!
पूर्वीच्या काळी बारावीच्या मार्कांवर आणि फक्त गुणवत्तेवर आधारीतच वैद्यकीय इंजिनिअरिंग अशा प्रोफेशनल कोर्सना प्रवेश मिळायचा...! त्यामुळे त्या व्यवसायाची देखील प्रतिष्ठा अबाधित राहायची...! त्यामुळे आजची शिक्षण पध्दती...खाजगी कॉलेजेस...खाजगी क्लासेस...यावर शिक्षण क्षेत्रातील लोकांनी विचार करण्याची गरज आहे . फक्त गुण नकोत तर गुणवत्ता वाढवणारे शिक्षण हवे...एक चांगला प्रामाणिक नागरिक जर ह्या शिक्षणातुन तयार होत नसेल तर...90 टक्के...100 टक्के मिळणारे गुण हा केवळ मार्कंचा फुगवटाच नव्हे काय...?
-----------------------------
: एका मार्कासाठी, एका सीट साठी विद्यार्थी आपले संपूर्ण तारुण्य पणाला लावतो
सो ज्योती बापू शिंदे
----------------
पूजा खेडकर प्रकरण जेव्हा समोर आलं, तेव्हा मनाला पहिला धक्का बसला होता.
कारण त्या घटनेने एक गोष्ट स्पष्ट झाली होती
या देशात काही लोक मेहनतीने नाही, तर व्यवस्थेतील पळवाटा शोधून पुढे जात आहेत.
पण NEET पेपरफुटीचं प्रकरण समोर आल्यानंतर…
मनात उरलेलाही विश्वास कोसळला.
आज खरंच समजत नाही…
या देशातील विद्यार्थ्यांना नेमकं काय सांगायचं?
“मेहनत करा…” ?
“प्रामाणिक राहा…” ?
“स्वप्नांसाठी झुंजा…” ?
कशासाठी…?
जेव्हा एखादा विद्यार्थी दिवसाचे १८-१८ तास अभ्यास करतो…
स्वतःला एका खोलीत बंद करून घेतो…
मोबाईल, मित्र, आनंद, सण, वाढदिवस सगळं विसरतो…
आई-बाबांच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचं आयुष्य थांबवतो…
आणि दुसरीकडे कोणीतरी लाखो रुपये मोजून प्रश्नपत्रिका विकत घेतो…!
त्या विद्यार्थ्याची अवस्था कधी जवळून पाहिली आहे का…?
रात्री ३ वाजेपर्यंत अभ्यास करून
थकून पुस्तकावरच झोप लागते…
सकाळी पुन्हा अपराधी वाटतं “काल अजून दोन chapter झाले असते तर…?”
एका मार्कासाठी…
एका सीटसाठी…
एक मुलगा स्वतःचं संपूर्ण तारुण्य पणाला लावत असतो.
त्याच्या आईला नवीन साडी नको असते…
वडिलांना नवीन फोन नको असतो…
घरातल्या प्रत्येकाचं एकच स्वप्न असतं
“आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे…”
कारण गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबात
डॉक्टर होणं म्हणजे फक्त degree नसते…
तर पिढ्यानपिढ्यांचा संघर्ष संपण्याची आशा असते.
पण शेवटी काय होतं…?
ज्याच्याकडे पैसा आहे, ओळखी आहेत, पळवाटा आहेत
तो पुढे निघून जातो…
आणि ज्याच्याकडे फक्त मेहनत आहे
तो एका मार्काने हरतो.
त्या एका मार्कामागे
कुणाचं आयुष्य तुटतं…
कुणाचं आत्मविश्वास मरतो…
कुणाचं स्वप्न कायमचं गाडलं जातं तर कोणी स्वतःच आयुष्य संपून टाकतात.
काही विद्यार्थी तर इतके तुटून जातात की
स्वतःलाच दोष द्यायला लागतात
“कदाचित मीच कमी पडलो…”
पण खरं कारण त्यांची कमी मेहनत नसते…
तर व्यवस्थेची घाण असते.
आज त्या विध्यार्थीनी आत्महत्या केल्या आहेत त्या च्या घरातील लोकांना त्या माटेगावकर याच्या प्रॉपर्टी निलाव करू हात भर लावावा.
आणि त्या मटेगांवकर वर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे
-------------------------------------
: केवळ एक पेपर फुटत नाही तर लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चक्काचुर होतो...
सौ.ज्योती दिनेश मुथा
------------------
नीट (NEET) पेपरफुटी: प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेला जीवघेणा खेळ त्वरित थांबवा!
वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवून मानवतेची सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून रात्रंदिवस एक करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी 'नीट' (NEET) परीक्षेचा पेपर फुटणे ही अत्यंत संतापजनक, धक्कादायक आणि दुर्दैवी घटना आहे. देशाचे भवितव्य घडवणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेला लागलेले हे भ्रष्टाचाराचे ग्रहण अतिशय चिंताजनक आहे. एक शिक्षक या नात्याने, विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील नैराश्य आणि त्यांच्या उध्वस्त झालेल्या स्वप्नांचे तुकडे पाहून मला या व्यवस्थेची तीव्र चीड येते.
दोन-दोन वर्षे प्रचंड बौद्धिक मेहनत, मानसिक ताणतणाव आणि पालकांचा मोठा आर्थिक त्याग पणाला लावून सामान्य कुटुंबातील विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जातात. रात्र-रात्र जागून केलेल्या अभ्यासावर जेव्हा काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पैशांच्या जोरावर पाणी फेरतात, तेव्हा तो केवळ एका परीक्षेचा पेपर फुटत नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या आशा, आकांक्षा आणि त्यांच्या प्रामाणिक कष्टांचा पार चक्काचूर होतो. गुणवत्तेचा असा जाहीर लिलाव होत असेल, तर हा होतकरू विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा घोर अपमान आहे. अशा घटनांमुळे देशाच्या पवित्र शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास उडत चालला आहे. हा केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित प्रश्न नाही, तर भविष्यात आपल्या देशाची आरोग्य व्यवस्था कुणाच्या हाती जाणार आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा अत्यंत गंभीर विषय आहे.
शासनाने आणि संबंधित परीक्षा नियामक मंडळाने या प्रकरणाची केवळ वरवरची सारवासारव न करता, सखोल आणि अत्यंत पारदर्शक चौकशी करावी. या काळ्या बाजारातील मुख्य सूत्रधारांना शोधून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे, जेणेकरून भविष्यात कुणीही विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचे धाडस करणार नाही. तसेच, भविष्यात परीक्षा पद्धती अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि अभेद्य बनवण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलणे ही काळाची गरज आहे.
'मुथा नॉलेज फाउंडेशन' या अन्यायकारक परिस्थितीत तमाम प्रामाणिक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या घामाच्या प्रत्येक थेंबाला न्याय मिळालाच पाहिजे, हीच आमची आग्रही आणि ठाम भूमिका आहे.
************************************