राजश्री शाहू बहुउद्देशीय सामाजिक संस्था धाराशिव यांच्या वतीने वृक्षारोपण तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मान्यवरांची उपस्थिती
*राजर्षी शाहू बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात*
*२१ वृक्षांचे वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव*
*धाराशिव, दि. २७ :(प्रतिनिधी)* सूर्यमुद्रा न्यूज
येथील राजर्षी शाहू बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थी प्रोत्साहन या त्रिसूत्रीवर आधारित या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास प्रा. डॉ. मल्लिनाथ बिराजदार (प्राध्यापक, जवाहर महाविद्यालय, अणदूर), जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, सुरक्षा समिती सदस्य अब्दुल लतिफ आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्षा उज्वला शिंदे अध्यक्षस्थानी होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. मान्यवरांचे रोपटे देऊन पर्यावरणपूरक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविकात अध्यक्षा उज्वला शिंदे यांनी संस्थेची स्थापना, उद्दिष्टे व सामाजिक कार्याची माहिती दिली. संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेमार्फत आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याचा गौरव करून सामाजिक क्षेत्रातील या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. सुरक्षा समिती सदस्य अब्दुल लतिफ यांनी संस्थेच्या कार्याची चांगली सुरुवात झाल्याचे सांगत वृक्षारोपण उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
प्रा. डॉ. मल्लिनाथ बिराजदार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि लोककल्याणकारी कार्याचा विविध ऐतिहासिक प्रसंगांच्या माध्यमातून उहापोह केला. समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा आदर्श घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात उज्वला शिंदे यांनी संस्थेच्या भावी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी दै.तरुण भारत चे पत्रकार श्रीकांत अणदूरकर,सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे, डी एस पी न्युज जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत गायकवाड,संतोष चौंडवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये आंबा, चिकू, नारळ, आवळा, सुपारी, मोहा, अंजीर, बेल आणि बहावा अशा विविध प्रजातींची एकूण २१ झाडे लावण्यात आली. यापूर्वी संस्थेमार्फत २० जून रोजी विद्यामाता हायस्कूल, धाराशिव येथेही १० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले होते. अशा प्रकारे संस्थेच्या माध्यमातून एकूण ३१ वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रसन्ना कंदले यांनी केले. संस्थेचे सचिव रमेश पाटील यांच्यासह ज्योती राजे निंबाळकर,वनिता शिंदे, माधवी पारीख आदी संस्थेचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, विद्यार्थी व यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
*वृक्ष संवर्धनाचा संदेश*
राजर्षी शाहू बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधत केवळ औपचारिक कार्यक्रम न घेता वृक्षारोपणाचा सामाजिक उपक्रम राबविला. संस्थेने आतापर्यंत ३१ विविध प्रकारची झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. "वृक्ष लावा, वृक्ष जगवा" हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्याचा प्रयत्न संस्थेने केला आहे.