इंधन संकटामुळे शिक्षणावर परिणाम टाळण्यासाठी घराजवळील शाळांमध्ये प्रवेश घ्य -ा विजयकुमार गुंड
*इंधन संकटामुळे शिक्षणावर परिणाम टाळण्यासाठी घराजवळील शाळांमध्ये प्रवेश घ्या*
ऑनलाइन शिक्षणाला विरोध; शिक्षक भारतीचे पालकांना आवाहन
सोलापूर : (सूर्यमुद्रा न्यूज) 14
पश्चिम आशियाई देशांतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारताच्या इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, डिझेल-पेट्रोलचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार “वर्क फ्रॉम होम” पद्धतीचा अवलंब करण्याबाबतही सूचना देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षण व्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असे मत विजयकुमार गुंड जिल्हा प्रवक्ते शिक्षक भारती यांनी व्यक्त केले आहे.
इंधन दरवाढ किंवा इंधन तुटवड्यामुळे स्कूल बसचे शुल्क वाढू शकते. काही ठिकाणी स्कूल बस सेवा बंद पडल्यास खासगी शाळांकडून पुन्हा ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षण घेणे आवश्यक असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागले होते. त्या काळात विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासावर विपरीत परिणाम झाल्याचे अनुभव समोर आले होते. शिक्षकांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन, अध्ययनातील अडचणींचे तत्काळ निरसन तसेच मित्रांबरोबरचे सामाजिक सहजीवन या गोष्टी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी महत्त्वाच्या मानल्या जातात.
इंधनाच्या समस्येमुळे शिक्षणाची गाडी थांबू नये म्हणून जवळच्या शाळेत प्रवेश घेणे योग्य ठरेल.
#ऑनलाइन_शिक्षणाला_विरोध
भविष्यात इंधन संकट अधिक तीव्र झाल्यास घरून शिक्षण घेण्याचे आवाहन होऊ शकते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांचा प्रवेश घराजवळील किंवा गावातील शाळांमध्ये घेण्याचा विचार करावा, असे आवाहन शिक्षक भारती सोलापूरचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांचेकडून करण्यात आले आहे. विद्यार्थी सायकलने किंवा पायी शाळेत जाऊ शकतील, अशा शाळांना प्राधान्य दिल्यास इंधन संकटाचा त्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही, असेही सांगण्यात आले.
ग्रामीण भागात सरकारी तसेच अनुदानित शाळांची सुविधा उपलब्ध असून, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी या शाळांना प्राधान्य देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
*“प्रत्येक गावात सरकारी शाळा व मोफत शिक्षण देणाऱ्या अनुदानित संस्था आहेत. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश या शाळांमध्ये घ्यावा. इंधन तुटवड्यामुळे स्कूल बसचा खर्च वाढणार आहे किंवा काही ठिकाणी बस सेवा बंद पडल्यास खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.”*